महिला संसदरत्न पुरस्कार

यंदाचा महिला संसदरत्न पुरस्कार मला सलग दुसऱ्यांदा मिळाला त्याबद्दल अनेकांचे अभिनंदनाचे संदेश मिळाले त्या सर्व व्यक्तींचे हार्दीक आभार. हा पुरस्कार संसदेमधील चर्चेमध्ये घेतलेला सहभाग, विचारलेले प्रश्न, मांडलेली खाजगी विधेयके आणि उपस्थिती यांच्या आधारे दिला जातो. पंधराव्या लोकसभेमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक महिलांची संख्या होती. एकूण ६५ महिला खासदार लोकांच्या प्रतीनिधी म्हणून संसदेच्या सभागृहामध्ये उपस्तित होत्या. महिला संसदरत्न पुरस्कार स्विकारताना मी त्या दिवसाची वाट पाहते आहे ज्या दिवशी लोकसभेमध्ये एक तृतीयांश महिला असतील आणि त्या महिलांच्या सुरक्षेचे आणि विकासाचे आणि जोरकसपणे मांडतील. बीजींगच्या महिला परिषदेदरम्यानचे वाक्य ‘ जगाकडे स्त्रीयांच्या नजरेने पहा’’ खरे होईल.
संसदेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या बारा लोकप्रतिनिधींमध्ये महाराष्ट्रातील सहा लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने बहूमताने निवडून दिल्यानंतर मतदारसंघातील आणि संपूर्ण राज्यभरातील लोक माझ्या संपर्कात होते. चर्चांमधील मुद्दे तसेच लोकसभेमध्ये विचारावयाचे प्रश्न हे खरंतर लोकांकडूनच माझ्यापर्यंत येत होते जे लोकसभेच्या पटलावर मांडण्याची संधी मला मिळाली. या सर्व लोकांचे मनापासून आभार.
पंधराव्या लोकसभेमध्ये या वातावरणामध्ये देखील अत्यंत चांगल्या चर्चा झाल्या. लोकपाल संबंधी चर्चेदरम्यान आपल्या लोकशाहीचा मुलभूत ढाचा आणि त्यामध्ये शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था याच्यातील संबंधांची चर्चा झाली. महिलांच्या सुरक्षेसाठी फौजदारी कायद्यांत बदल घडऊन आणण्याबाबत चर्चा होत होती तेव्हा संपूर्ण सदन या बदलांच्या बाजूने उभे असलेले दिसले. अन्नसुरक्षा कायदा, जमिन अधिग्रहणादरम्यान योग्य मोबदला आणि पुनर्वसन अधिकारासंबंधीचा कायदा अशा अनेक बाबतीत सकारात्मक चर्चा घडून आली.
संसदेची मागिल काही सत्रे ही संसदेमधील निर्णयांसोबतच गोंधळामुळे देखील चर्चेत होती. लोकशाहीमध्ये संसदेतील चर्चांना अनन्यसाधारण महत्व आहे. सरकारतर्फे घेतल्या गेलेल्या कोणत्याही निर्णयाबाबत संसदेत साधक-बाधक चर्चा होणे, वेगवेगळे मतप्रवाह समजून घेणे अपेक्षित असते परंतू गोंधळाच्या वातावरणामध्ये या प्रक्रियेलाच खीळ बसते. आमच्यापैकी अनेक खासदार मुद्यांवर चर्चा करण्याकरीता उत्सुक असतात. यापुढील अधिवेशनांमध्ये लोकांचे प्रश्न लोकसभेच्या पटलावर येतील अशी मला खात्री वाटते
.

लोकसभा अधिवेशनासाठी जाताना……….

आज संध्याकाळी संसदेच्या अधिवेशनाकरीता दिल्लीला रवाना होत आहे. पंधराव्या लोकसभेचे हे शेवटचे असेल. गेल्या पाच वर्षांत लोकसभेमध्ये अनेक घडामोडी झाल्या अनेक नविन कायदे पारीत करण्यात आले. लोकपाल संबंधी कायदा, महिला सुरक्षेसंबंधी कायद्यात बदल, विस्थापित जनतेच्या पुनर्वसनाच्या हक्काचे विधेयक अशी अनेक विधेयके पारीत करण्यात सरकारला यश आले आहे. महिलांच्या लोकसभा व राज्यसभेतील आरक्षणाविषयीच्या कायदा पंधराव्या लोकसभेत अजूनपर्यंत तरी पारीत होऊ शकला नाही. या अधिवेशनात हा कायदा पारीत व्हावा अशी इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील देखील आहोत. याशीवाय अनेक बीले लोकसभेत पारीत व्हावीत अशी अपेक्षा आहे. मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी विशेष सोयी सुविधा असाव्यात या संबंधी एक खाजगी विधेयक मी देखील लोकसभेत मांडले आहे. या अधिवेशनात त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त खासदारांचा त्यास पाठींबा मिळावा याकरीता मी प्रयत्नशील आहे.

या अधिवेशनात अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अर्थसंकल्प सादर होतो. ह्या अर्थसंकल्पात मागील वर्षातील भारत सरकारच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेतला जातो आणि येणाऱ्या वर्षात होणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक सदर केले जाते. त्या अर्थसंकल्पास भारताचे विधिमंडळ मंजुरी देते. २००९ ते २००१४ ह्या सरकारच्या कार्यकाळात मा. ना. पी. चिदंबरम ह्यांनी ५ अर्थसंकल्प सादर केले.

पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने मा. अर्थमंत्री हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. निवडणूकांनंतर अर्थसंकल्पाची प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. वार्षिक अर्थसंकल्पासारखाच हंगामी अर्थसंकल्प तपशीलवार सादर केला जातो. पुढील काही महिन्यातील खर्च तपशीलवार दिला जातो. परंतु आयकरामध्ये अर्थमंत्र्यांना बदल करता येणार नाहीत.

२०१४ च्या हंगामी अर्थसंकल्पात काही बदल करण्याचे संकेत मा. अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. त्यापैकी सरकार उत्पादन शुल्कात (excise ) आणि सेवा करामध्ये (service tax) काही बदल करणे अपेक्षित आहे. आयकारामध्ये बदल होऊ शकत नसले तरीही भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे काही बदल इतर मा. अर्थमंत्री करू पाहतील. २०१४-१५ चा हंगामी अर्थसंकल्पातून सामाजिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून शिक्षण, आरोग्य, अन्न, ग्रामीण जनता आणि महिला ह्या क्षेत्रात नवीन योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. मागील वर्षात वित्तीय तुटीत सुधारणा झाल्यामुळे मा. अर्थमंत्री तेल कंपन्यांना इंधन बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकत असल्याने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचा प्रयत्न करतील.

मागिल चार वर्षे सलग मी रेल्वे बजेटवर संसदेत भाषण करीत आहे. बारामती मतदारसंघ व महाराष्ट्रातील रेल्वेचे अनेक प्रश्न याद्वारे मला मांडता आले. रेल्वेची सुरक्षा आणि आधुनिकीकरण हे सध्याचे महत्वाचे मुद्दे समोर येत आहेत. महाराष्ट्रातील अनेक रेल्वे मार्गांना मंजूरी घेणे, नविन गाड्यांची मागणी होत असताना त्या गाड्यांची गरज पटवून देणे या गोष्टी या भाषणांतून करता आल्या. गेल्या अर्थसंकल्पात अनेक वर्षांनतर प्रवासी भाड्यात वाढ झाली. गेल्यावर्षी महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांना पुरेशा निधीची तरतूद व्हावी याकरीता आम्ही सर्वपक्षिय खासदार माननीय पंतप्रधानांना देखील भेटलो होतो. बारामती-कर्जत तसेच हडपसर-जेजूरी या मार्गांसाठी बारामती आणि दौंड या स्थानकांवरून अधिक फेऱ्या सुरु व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

मधल्या काळात मतदारसंघातील लोकांसोबतच्या चर्चेत अनेक मुद्दे समोर आले आहेत. त्यांना लोकसभेतील चर्चेमध्ये मांडण्याचा प्रयत्न या अधिवेशनात राहील.

पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार होतांना…..


पोलिओमुक्त भारत……
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या धोरणानुसार गेल्या तीन वर्षापासून म्हणजेच जानेवारी २०११ पासून पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे भारत पोलिओमुक्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कोणतेही उद्दिष्ट गाठण्यासाठी ७० ते ८० टक्क्याच्या टप्प्यापर्यंत पोहचणे तसे तुलनेत सोपे असते. परंतु १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रचंड प्रमाणातली मेहनत, ध्यास याची आवश्यकता असते. भारत सरकारच्या आरोग्य विभागाने हे उद्दिष्ट गाठले आहे याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन… आरोग्य विभागाचे अभिनंदन आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतांनाच अमिताभ बच्चन यांची “दो बुंद जिंदगी की.. ही परिणामकारक जाहिरात जशी आठवते तसेच तुमच्या-आमच्या घरी येऊन ५ वर्षाच्या आतले बाळ आहे का हे विचारणारी आरोग्यसेविका, एस.टी स्थानकावर पोलिओ डोस घेऊन फिरणारे कर्मचारी यांचीही आठवण ठेवणे अत्यंत निकडीचे आहे.. वेळेवर लसीकरण न झाल्याने दुर्दैवाने अपंगत्वाला सामोरे जावे लागणारी बालके पाहिली की अशा प्रकारच्या मोहिमांची किती आवश्यकता आहे हे पटते.
पोलिओ बरोबरची ही लढाई आपण जिंकलो असलो तरीही युद्ध अजून संपलेले नाही. भविष्यात पोलिओचा एकही रुग्ण आढळणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. गेल्या तीन वर्षात एकही पोलिओचा रुग्ण आढळला नसला तरीही इथून पुढे अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. स्थलांतर, डोस घेण्याबाबत असलेले गैरसमज या सगळ्यामुळे ही मोहीम थंडावली जाता कामा नये ही अपेक्षा.. आपला आरोग्य विभाग हळूहळू त्याचे उद्दिष्ट साध्य करतो आहे. त्यांच्या या प्रयत्नांना माध्यमे, नागरिकांनी अनुकूल प्रतिसाद देणे अत्यंत आवश्यक आहे. आज पुन्हा पोलिओ रविवार आहे. आज आपल्या ० ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस केंद्रावर नेऊन नक्की डोस द्या असे आवाहन करते… पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार होत असले तरी इथून पुढची वाटचाल अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हा एक टप्पा गाठला असला तरीही अजून पुढचे असे अनेक टप्पे आपल्याला गाठायचे आहे. याची जाणीव सतत ठेवणे गरजेचे आहे.

Pravasi Bharatiya Divas


Pravasi Bharatiya Divas (PBD) is celebrated on 9 January every year to mark the contribution of Overseas Indian community in the development of India. January 9 was chosen as the day to celebrate this occasion since it was on this day in 1915 that Mahatma Gandhi, the greatest Pravasi, returned to India from South Africa, led India’s freedom struggle and changed the lives of Indians forever. I had the privilege of attending PBD on 7th of January 2014.

PBD conventions are being held every year since 2003. These conventions provide a platform to the overseas Indian community to engage with the government and people of the land of their ancestors for mutually beneficial activities. These conventions are also very useful in networking among the overseas Indian community residing in various parts of the world and enable them to share their experiences in various fields.

During the event, individuals of exceptional merit are honoured with the prestigious Pravasi Bharatiya Samman Award to appreciate their role in India’s growth. The event also provides a forum for discussing key issues concerning the Indian Diaspora. This year 13 awards were given to merit holders in various fields from 12 different countries. It was quite rejuvenating to see young achievers in one of the sessions.

PBD is a platform which provides India with an opportunity to convey its achievements to the world. Rising globalisation has provided India an easy access to the opportunities around the world. A very large no of Indians are who are residing in various other countries are demonstrating their talent various fields across the globe. I believe this event helps a lot in strengthening the cultural ties between India and all the other countries.

However, India is still struggling with gender issues. After attending such events I feel all the more need to work towards making India a society with equal rights.

Youth Pravasi Bharatiya Divas celebrates the spirit of Indian youth…. I am so proud of our Maharasthrian kids who are going to perform on 26th January. I wish them all the very best!

८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खा. सुप्रिया सुळे यांच्या भाषणाचे अंश

१८९३ सासवड येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन झाले. या अधिवेशनाला सावित्रीबाई फुले या अध्यक्ष होत्या.  आज त्याला १२० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि योगायोगाने आज सावित्रीबाई फुलेंची जयंती देखील आहे. त्यांना वंदन करून सासवड सारख्या पौराणिक, ऐतिहासिक,  सांस्कृतिक आणि  सामाजिक बाबतीत समृद्ध वारसा असणा-या पुरंदरच्या भूमीत क-हेच्या काठावर आपण सर्व साहित्यिक, साहित्यरसिक या संमेलनाच्या निमित्ताने एकत्र जमलात याचा मला खूप आनंद आहे. याच क-हेचे पाणी पुढे बारामती येथेही येते आणि याच पाण्याच्या काठावर  आमचही जीवन फुललेलं आहे बहरलेलं आहे.  त्या अर्थाने आणि या विभागाची संसदेतील लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे मी मनःपूर्वक स्वागत करते.

या संमेलनाचे अध्यक्ष मा.प्रा.फ.मुं. शिंदे हे आहेत ही माझ्या दृष्टीने अजून एक आनंदाची गोष्ट आहे. माझ्या सगळ्या धावपळीच्या कामाच्या व्यापात वेळ काढून जरूर काही वाचन मी नियमित करत असते.  त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय, वैचारिक आणि इन्फर्मेटीव्ह अशा पुस्तकांना प्राधान्य देत असते.  मराठीतील उत्तम नाटक, सिनेमे हे मी आवर्जून पाहते .चांगल संगीत वेळ काढून ऐकते, कथा कादंब-या वाचायला आवडतात.  मा.प्रा. फ.मुं. शिंदेंच्या ‘आई’ व इतर काही कविता मी वाचलेल्या आहेत व त्या मला खूप आवडतात.

‘आई एक नाव असतं

घरातल्या घरात गजबजलेल गाव असतं’.

      त्यांच्या या ओळी ऐकताना माझी आजी माझ्या डोळ्यासमोर येते.  चांगलं साहित्य म्हणजे हेच की, दुस-याचा अनुभव हा आपल्याला आपलाच वाटतो.

त्यांच्या कोट्या, विनोद आणि किस्से याबद्दल मी फार ऐकून आहे आणि त्यासाठी ते महाराष्ट्रात किती लोकप्रिय आहेत याची मला माहिती आहे.  गेल्या दीड वर्षापूर्वी आम्ही राजकारणामध्ये युवतींची संघटना उभी केली त्यावेळी माझ्या महाराष्ट्रातील हजारो युवतींशी गाठीभेटी झाल्या त्याकाळात माझ्या पुण्याच्या कार्यालयात एक टॉमबॉय सारखी दिसणारी मुलगी आली.  मला तुमच्या युवतींच्या संघटनेमध्ये काम करायचे आहे असे तिने मला सांगितले.  ती एक उत्तम क्रिकेटर होती हे ही तिने मला सांगितलं. तेव्हापासून ती माझ्याबरोबर सातत्याने काम करत आहे.  तिचं नाव ऋचा शिंदे आणि ती आपले संमेलनाचे अध्यक्ष मा. प्रा. फ.मुं. शिंदे यांची मुलगी आहे हे मला उशिरा कळलं.  त्यांची ती एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे शिंदे पती-पत्नी साहित्यिक असले तरी त्यांची पुढची पिढी आता समाजकारणात व राजकारणात उतरली आहे.

त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेपर्यंत मराठी कविता पोहचविण्याचे काम त्यांनी आणि त्यांचे मित्र रामदास फुटाणे यांनी सातत्याने सुरु ठेवले आहे.  त्यामुळे अनेक कवी, लेखक घडायला लोकांसमोर यायला मदत झाली आहे. पुढील वर्षभर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांच्या हातून उत्तम कार्य घडेल असा मला विश्वास वाटतो व त्यासाठी मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देते.

या भूमीच्या वारसाचा आपण सर्वांनी गौरवाने उल्लेख केलेला आहे.  मात्र आचार्य अत्रे यांचे स्मरण यानिमित्ताने केले पाहिजे.  साहित्याबरोबरच चित्रपट, नाटक, वृत्तपत्र, शिक्षण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले होते.  समाजकारणातील आणि राजकारणातील आमच्या नव्या पिढीला जसा आदरणीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे. तसाच तो आचार्य अत्रेंचाही आहे.  हा पुरोगामी आणि आधुनिक महाराष्ट्र हा सुसंस्कृत आणि रसिक महाराष्ट्र या दिग्गाजांमुळे घडला आहे. त्या पिढीचे ऋण आम्हाला कधीही विसरता येणार नाहीत.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे सहकारी तसेच आचार्य अत्रे आणि त्यांचे सहकारी या सर्वांनी सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नवमहाराष्ट्र उभा केला आहे.  त्यांनी केलेल्या उत्तम पायाभरणीमुळे सर्व क्षेत्रात आजही महाराष्ट्र आघाडीवर आहे.  आज महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात अनेक संस्था, व्यक्ती  उत्तम काम करीत आहेत.  अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून ते गडचिरोलीपर्यंत अशा शेकडो संस्था आणि हजारो कार्यकर्ते अनेक साहित्यिक उपक्रम राबवीत असतात.  गेल्या दोन वर्षात संघटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरताना या सर्वांना भेटण्याचा, चर्चा करण्याचा मला योग आला.  त्यांचे काम पाहता आले.  महाराष्ट्र शासन देखील त्यासाठी त्यांना भरीव मदत करत आहे.  जवळपास बारा हजार सार्वजनिक वाचनालये आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत.  ती अजून किमान याच्या दुप्पट होण्याची गरज आहे.  कारण महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत.  गाव तिथे एस. टी. वीज, आरोग्य सेवा पोहोचवण्यात आपण यशस्वी झालो.  आता ‘गाव तिथे ग्रंथालय ही मोहीम हाती घेऊन यशस्वी करण्याची गरज आहे.

मराठीत दरवर्षी काही हजार ग्रंथ प्रकाशित होतात.  ते वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.  त्यासाठी छोट्या छोट्या गावापर्यंत आपण ग्रंथप्रदर्शन घेऊन गेले पाहिजे.  २०१२-१३ या यशवंतरावजी चव्हाणसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आम्ही शंभर छोट्या छोट्या गावामध्ये ग्रंथाली वाचक चळवळीच्या माध्यमातून ग्रंथप्रदर्शने केली त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.  अशा उपक्रमाद्वारे आपण वाचन संस्कृती वाढवण्याचा सातात्त्याने प्रयत्न केला पाहिजे.

अलीकडे तंत्रज्ञानाचा (टेक्नोलॉजीचा)  वापर फारच मोठ्या प्रमाणात करताना तरुण पिढी आपल्याला दिसते.  त्याचा परिणाम साहित्यावर आणि वाचनावर होताना दिसतो.  पण मला खात्री आहे की, नव्या पिढीलाही पुस्तकांची गरज आहे.  मात्र ती त्यांच्या फॉर्ममध्ये आपण दिली पाहिजे.  ई –बुक्स, ऑडीओ बुक्स (बोलती पुस्तक),  अशा नव्या माध्यमातून आपण त्यांच्या पर्यंत ग्रंथ, पुस्तके पोहचवली पाहिजेत म्हणजे उद्या कदाचित त्यांच्या हातात पुस्तक दिसणार नाही तर कानात नक्की असेल. आपल्या अनेक शाळात ग्रंथालये आहेत पण खूप शाळेत अजून नाहीत.  त्या सर्व शाळांमध्ये आपण पुस्तकं पोहचविली पाहिजेत.  आज आमच्या खासदार आणि आमदार फंडातून पुस्तके खरेदी करून वाचनालये, संस्थाना देता येतात.  अशी सोय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा मिळाली पाहिजेत.  पुस्तकासाठी त्यांना फंड मिळाला पाहिजे.  मी तर अशी सूचना करीन की, प्रत्येक शाळेत जसा पी. टी. चा किंवा कार्यानुभावाचा तास असतो तसाच आठवड्यातून दोनदा वाचनाचा तास सुद्धा असला पाहिजे आणि तो सक्तीचा असला पाहिजे.

आपली मराठी भाषा ही तुमच्या आणि माझ्या अभिमानाची गोष्ट आहे.  आपल्या भाषेवर आपलं सर्वांचच खूप प्रेम आहे.  यशवंतराव यांनी  आधुनिक महाराष्ट्रासाठी कृषी औद्योगिक समाज (अग्रो- इंडस्ट्रीयल सोसायटी) निर्माण करण्याची संकल्पना मांडली.  तो त्यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढींनी घडवून आपल्या हाती दिला आहे.  आपल्याला आता या पुढे जाऊन या समाजाला नॉलेज बेस सोसायटी (ज्ञानआधारित समाज) अशा पद्धतीने पुढे न्यावे लागणार आहे. आपला एक हात शेताच्या मातीत असला तर दुसरा हात कॉम्पुटरच्या की-बोर्डवर असला पाहिजे.  शेती आणि संगणक हेंच आपलं भविष्य आहे.  मराठी साहित्यामध्ये कृषी संस्कृतीबरोबर संगणक संस्कृतीही दिसली पाहिजे.  तरच मराठी समाज काळाच्या ओघात टिकून राहील, सक्षम होईल आणि जो समाज टिकतो, त्याचीच भाषा टिकते, त्याचेच साहित्य टिकते.  संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आणि शुभेच्छा…

८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

३ जानेवारी २०१४, सासवड